विधान परिषद निवडणूक : 17 पैकी 6 जागांवर बिनविरोध विजय, उर्वरित 11 जागांसाठी रंगणार चुरशीची लढत
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी 6 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे आता उर्वरित 11 जागांसाठी चुरशीची लढत रंगणार असून, कोणत्या उमेदवाराचे पारडे जड ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीची मतदान पद्धत सर्वसाधारण निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. येथे प्रमाण प्रतिनिधित्व पद्धतीनुसार मतदान घेतले जाते. त्यामुळे मतदारांच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांना विशेष महत्त्व असते. याच पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाते, याविषयी उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
परभणीच्या निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारांना मतपत्रिकेवर उमेदवारांसमोर पसंतीक्रम नोंदवावा लागतो. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हे मतदार आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवारासमोर ‘1’ हा आकडा लिहितात. त्यानंतर इच्छेनुसार दुसऱ्या पसंतीसाठी ‘2’, तिसऱ्या पसंतीसाठी ‘3’ असा क्रम देता येतो.
या प्रक्रियेत पहिल्या पसंतीच्या मतांना सर्वाधिक महत्त्व असते. एखाद्या उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पहिल्याच फेरीत प्राप्त झाल्यास त्याला थेट विजयी घोषित केले जाते. मात्र आवश्यक मतसंख्या न मिळाल्यास दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांचा विचार करून अंतिम निकाल निश्चित केला जातो.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या 17 जागांपैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. हा बिनविरोध विजय महायुतीसाठी मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक मानला जात असून, उर्वरित जागांवरील लढतींसाठी तो एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवणारा टप्पा ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.




