धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही उद्याचा मोर्चा कायम! उद्धव ठाकरे म्हणाले, 'लढा अजून संपलेला नाही

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही उद्याचा मोर्चा कायम! उद्धव ठाकरे म्हणाले, 'लढा अजून संपलेला नाही

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. राजीनाम्याची बातमी समोर आली असली, तरी आंदोलन अद्याप संपलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजित दिपके आणि आंदोलनात सहभागी सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला.

ठाकरे म्हणाले की, आंदोलनाची प्रमुख मागणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची होती. मात्र, हा खरोखरच राजीनामा आहे की केवळ खातेबदल, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, पुढे या प्रकरणात सरकार कोणती भूमिका घेणार, हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईवरही त्यांनी टीका केली. संबंधित पोलिस अधिकारी आणि आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की,उद्याचा नियोजित कार्यक्रम रद्द होणार नाही. उलट, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने देशातील युवाशक्तीची ताकद दाखवून दिली असून, पुढील लढ्याची दिशा आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून निश्चित केली जाईल.

त्यांनी शेवटी जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करत, शिवाजी पार्क येथे पूर्वनियोजित कार्यक्रम नियोजनाप्रमाणेच होणार असल्याची माहिती दिली.