नेहरू-मोदी तुलना योग्य नाही; पवारांचे मत, फडणवीसांचे प्रत्युत्तर
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाचा गौरव केला. नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले की, नेहरूंनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावत देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या कार्याची तुलना इतर कोणत्याही नेत्याशी करणे योग्य ठरणार नाही.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहरू आणि मोदी यांच्यात कोणतीही स्पर्धा नसल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, निवडून आलेल्या पंतप्रधानांपैकी सर्वाधिक कार्यकाळाचा नेहरूंचा विक्रम पंतप्रधान मोदी यांनी मागे टाकला आहे. मात्र, दोन्ही नेत्यांचे कार्य वेगवेगळ्या काळातील असून त्यांची तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
नव्या भारताच्या उभारणीत पंतप्रधान मोदी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे.शिखांविरोधातील 1984 मधील दंगलींचा उल्लेख करताना फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. त्या घटनांचा निषेध आम्ही कायम करत राहू, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदींसोबतच्या कामकाजातील अनुभव सांगताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबत मोदी यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. विशेषतः 2015 च्या दुष्काळाच्या काळात राज्याला केंद्राकडून मोठी मदत मिळाली. महाराष्ट्रातील विविध सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठीही केंद्राने सहकार्य केले, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून भाजप सरकार पडेल, असे भाकीत केले जात आहे; मात्र तसे घडलेले नाही. कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्यासाठी अशा प्रकारची विधाने केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.




