‘विकासनिधी’चे आमिष दाखवत राजाभाऊ वाजेंना पक्षांतराची ऑफर; प्रकाश वाजेंचा मोठा दावा
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना (ठाकरे गट) खासदार राजाभाऊ वाजे यांना पक्षांतरासाठी विकासनिधीचे आमिष दाखवण्यात आले होते, असा दावा त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी केला आहे. सध्याच्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा गौप्यस्फोट करत अनेक महत्त्वाचे खुलासे केले.प्रकाश वाजे यांनी सांगितले की, सुमारे दीड वर्षांपूर्वी ठाण्यातून काही प्रतिनिधी त्यांच्या संपर्कात आले होते. त्यांनी राजाभाऊ वाजे यांना सत्ताधारी गटासोबत येण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र हा प्रस्ताव स्वीकारण्यास आम्ही स्पष्ट नकार दिला, असे त्यांनी सांगितले.

त्यांच्या मते, संबंधित व्यक्तींनी “ठाकरे गटात अनेक नेते गेले असून आणखी काही जाण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे तुम्हीही सोबत या,” असे सांगत विकासनिधीचा मुद्दा पुढे केला होता. तसेच, वरिष्ठ नेतृत्वाकडून योग्य सन्मान राखला जाईल, असेही आश्वासन देण्यात आले होते.प्रकाश वाजे यांनी पुढे सांगितले की, या घडामोडीनंतर त्यांनी तातडीने उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली होती. पक्षांतराचा कोणताही प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
राजाभाऊ वाजे यांच्या राजकीय निष्ठेबाबत बोलताना प्रकाश वाजे म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश करताना राजाभाऊ यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे आजही त्यांची भूमिका बदललेली नाही.यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याचे सांगत, कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आमिषाला बळी पडण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, वाजे कुटुंबाचे लोकांशी अनेक वर्षांचे संबंध असून राजकारणापेक्षा सामाजिक कार्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.सध्याच्या राजकीय चर्चांदरम्यान राजाभाऊ वाजे यांच्या पक्षांतराच्या अफवांना कोणताही आधार नसल्याचेही प्रकाश वाजे यांनी यावेळी ठामपणे सांगितले.




