कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप; कंपनीच्या गेटवरच भाजप नेते वैभव खेडेकर आक्रमक

कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप; कंपनीच्या गेटवरच भाजप नेते वैभव खेडेकर आक्रमक

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधील कोका-कोला कंपनीत काही स्थानिक कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी कंपनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

कामगारांच्या तक्रारीनंतर कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी खेडेकर कंपनीत पोहोचले. मात्र, कंपनीच्या प्रवेशद्वारावरच त्यांच्या वाहनाला अडवण्यात आले. यामुळे ते संतप्त झाले आणि गेटवरील कर्मचाऱ्यांसोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. संबंधित कर्मचाऱ्याने आपण वरिष्ठांच्या आदेशानुसारच काम करत असल्याचे सांगितले.

यावर प्रतिक्रिया देताना वैभव खेडेकर म्हणाले, "ही काय संसद आहे का? मला आत जाण्यापासून का रोखलं जात आहे?" त्यांनी कंपनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, स्थानिक कामगारांवर अन्याय सहन केला जाणार नाही.

खेडेकर यांनी पुढे म्हटले की, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ८ ते १० स्थानिक भूमिपुत्रांना पुन्हा सन्मानाने कामावर घेतले नाही, तर येत्या आठ दिवसांत कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच भविष्यात कंपनी कोणत्याही अडचणीत सापडल्यास स्थानिकांचा पाठिंबा अपेक्षित ठेवू नये, असा इशाराही त्यांनी दिला.