मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना; मुलीवर अत्याचार,पीडितेसह आरोपीही अल्पवयीन

मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना; मुलीवर अत्याचार,पीडितेसह आरोपीही अल्पवयीन

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील माहिम परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शाळा सुटल्यानंतर एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेण्यात आले. नंतर तिचे हात-पाय आणि तोंड बांधून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून माहिम पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिममधील एका नामांकित शाळेजवळ 18 जून 2026 रोजी एका 16 वर्षीय आरोपीने या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिथे मुलीचे हात व तोंड बांधून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या घटनेत 16 वर्षीय ओळखीच्या आरोपीसोबत आणखी एक अनोळखी अल्पवयीन मुलगाही सहभागी होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

या संतापजनक कृत्यानंतर पीडित मुलीचे फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिची बदनामी करण्याची धमकी आरोपींनी दिली होती. यामुळे पीडित मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. अखेर धैर्याने पुढे येत पीडितेने माहिम पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली.

तक्रार प्राप्त होताच माहिम पोलिसांनी तात्काळ पावले उचलत भाभा रुग्णालयात पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोन्ही अल्पवयीन संशयितांवर माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.