राम मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय! चंपत राय, अनिल मिश्र यांचे राजीनामे मंजूर
मुंबई (प्रतिनिधी) : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या महत्त्वाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. दानपेट्यांमधील रकमेच्या मोजणी प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर महामंत्री चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्र यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत दिलेले राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत.

या बैठकीत दानाच्या हिशोबातील अनियमितता, सुरू असलेली एसआयटी चौकशी, ट्रस्टची आर्थिक स्थिती आणि पुढील प्रशासकीय व्यवस्था यावर सविस्तर चर्चा झाली. ट्रस्टने स्पष्ट केले की, प्रकरण समोर येताच उत्तर प्रदेश सरकारकडे निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने उच्चस्तरीय एसआयटीची स्थापना केली.
एसआयटीच्या प्राथमिक अहवालात आठ जणांची नावे समोर आली असून, प्रथमदर्शनी पुरावे आढळलेल्या संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी ट्रस्टची भूमिका असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
ट्रस्टने आर्थिक आकडेवारीही जाहीर केली. निधी समर्पण अभियान आणि कॉर्पस दानातून आतापर्यंत ३,२६४ कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्यापैकी २,३७० कोटी रुपये मंदिर उभारणी आणि भांडवली कामांवर खर्च करण्यात आले आहेत. तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत चढाव्यातून ५८२ कोटी रुपये मिळाले असून, त्यातील ३९१ कोटी रुपये संचालन खर्चासाठी वापरण्यात आले आहेत. उर्वरित निधी बँक खात्यांमध्ये सुरक्षित असल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले.
नवीन महामंत्री नियुक्त होईपर्यंत विश्वस्त कृष्ण मोहन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या (CEO) निवडीसाठी निवृत्त न्यायाधीश प्रमोद कोहली, निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी आणि सुरेश हावरे यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.वाद सुरू असतानाही श्रीराम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आणि श्रद्धा यामध्ये कोणतीही घट झालेली नसल्याचा दावा ट्रस्टने केला आहे.




