केजीएफ स्टारच्या आईची गंभीर तक्रार ; नेमकं प्रकरण काय..?
मुंबई - यशची आई आणि कन्नड चित्रपट ‘कोथलावाडी’ च्या निर्मात्या पुष्पलता सध्या एका गंभीर वादामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रमोटर हरीश आरासू यांनी फसवणूक, धमक्या आणि ६४.८ लाख रुपयांच्या नकारात्मक प्रसिद्धीस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत त्यांनी पाच जणांविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पुष्पलता यांनी निर्माती म्हणून पहिल्यांदाच पदार्पण केलेल्या ‘कोथलावाडी’ या चित्रपटाचा १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी हरीश आरासू यांच्यावर सोपवण्यात आली होती. चित्रपटाचे शूटिंग २४ मे २०२५ ते जुलैच्या मध्यापर्यंत तलाकडू, गुंडलुपेट, म्हैसूर आणि चामराजनगर येथे झाले. करारानुसार हरीश यांनी प्रमोशनसाठी २.३ लाख रुपये खर्च करायचे होते. मात्र, त्यांनी चित्रपटाचे नाव वापरून अनेकांकडून अतिरिक्त २.४ लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पलता यांनी असा आरोप केला आहे की, हरीशला एकूण ६,४८७,७०० रुपये दिले होते, ज्यात ३१ जुलै रोजी प्रिंट मीडियासाठी दिलेले ४ लाख रुपयांचा समावेश होता. जेव्हा पुष्पलता यांनी या रकमेबाबत स्पष्टीकरण मागितले, तेव्हा हरीश यांनी त्यांना धमकावून आणखी २.७ लाख रुपये मागितले, असा दावा करण्यात आला आहे.
त्यानंतर १ ऑगस्ट रोजी चित्रपटाचे प्रमोशनल साहित्य गायब असल्याचे लक्षात आले. त्याचवेळी हरीश चित्रपट आणि टीमबद्दल नकारात्मक प्रचार करत असल्याची माहिती मिळाली. परिस्थिती आणखी गंभीर झाली, जेव्हा १५ ऑगस्ट २०२५ रोजी पुष्पलता आणि दिग्दर्शक श्रीराज यांना हरीश, मनू, नितीन व काही अज्ञात व्यक्तींनी धमकीचे फोन दिल्याचे समोर आले.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर, पुष्पलता यांनी हाय ग्राऊंड्स पोलिस ठाण्यात हरीश अरासु, मनु, नितिन, महेश गुरु आणि स्वर्णलता (रणनायक) यांच्याविरुद्ध फसवणूक, धमकी, मानहानी आणि गुन्हेगारी षडयंत्राच्या आरोपांतर्गत तक्रार दाखल केली आहे.




