शाहू साखर कारखान्याचा राज्य पातळीवरील सहकार मंथन परिषदेत विशेष पुरस्काराने गौरव

शाहू साखर कारखान्याचा राज्य पातळीवरील सहकार मंथन परिषदेत विशेष पुरस्काराने गौरव

कागल (प्रतिनिधी) -  श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रतिष्ठित ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड’ या राज्य पातळीवरील विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय सहकार मंथन परिषदेत राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे, कॉसमॉस बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष मिलिंद काळे आणि ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल यांच्या हस्ते कारखान्याचे संचालक सचिन मगदूम,संजय नरके व कर्मचारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून ग्रीन वर्ल्ड व कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील सहकार भवन येथे हा महत्त्वपूर्ण सहकार मंथन कार्यक्रम पार पडला. या परिषदेत सहकार चळवळीसमोरील भविष्यातील आव्हाने,सहकार तत्त्वांचा प्रसार, व्यावसायिक प्रामाणिकता, पारदर्शकता, सामाजिक जबाबदारी तसेच शाश्वत विकास यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञांनी विचारमंथन केले.

स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या शाहू साखर कारखान्याला हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. सहकार मूल्यांशी प्रामाणिक राहून कारखान्याने केलेली प्रगती ही सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते आणि कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रल्हाद कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या समारंभात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध साखर कारखान्यांसह इतर सहकारी संस्थांचाही गौरव करण्यात आला. प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.