दिग्दर्शक - अभिनेता रणजीत पाटील यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन
मुंबई - मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दु: खद बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक आणि मराठी अभिनेता रणजीत पाटील यांचे वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी निधन झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना हृदयाशी संबंधित त्रास होता. रणजीत पाटील यांच्या अचानक जाण्याने मराठी सिनेसृष्टी, रंगभूमी आणि दूरदर्शन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. इतक्या तरुण वयात त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

गेल्या काही वर्षांपासून रणजीत पाटील हे मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट क्षेत्रात सक्रिय होते. एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुण कलाकारांना व्यासपीठ दिले आणि प्रोत्साहन दिले. अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. तसेच, तरुण रंगकर्मींना मार्गदर्शन करून त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्याचे महत्त्वाचे कार्यही त्यांनी केले. रूईया महाविद्यालयातील एकांकिकांच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती.
सध्या रणजीत पाटील अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचे दिग्दर्शन करत होते. दिग्दर्शनासोबतच अभिनयातही त्यांनी आपली छाप पाडली होती. झी मराठीवरील ‘हृदय प्रीत जागते’ या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणजीत पाटील यांच्या पश्चात आई - वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.




