सूनीचे गंभीर आरोप फेटाळत विनायक राऊतांचा पलटवार
मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्याविरोधातील कौटुंबिक छळ आणि जादूटोणा प्रकरणातील आरोप फेटाळत पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी राऊत कुटुंबाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर 23 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना विनायक राऊत यांनी सूनीने केलेले आरोप निराधार असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, गिरीजा राऊत यांनी स्वतःच्या तक्रारीत 29 डिसेंबर 2023 रोजी स्वेच्छेने माहेरी गेल्याचा उल्लेख केला आहे. त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपले स्त्रीधन आणि सुमारे 10 ते 12 बॅगा भरून कपडे व इतर सामान सोबत नेल्याचेही त्यांनी नमूद केले.
राऊत यांनी पुढे दावा केला की, त्यानंतर समेटाच्या चर्चेदरम्यान आर्थिक मागण्या सातत्याने वाढत गेल्या. सुरुवातीला दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तीन बीएचके फ्लॅट, ऑटोमॅटिक कार, पुढे पाच कोटी रुपये आणि अखेरीस तब्बल 12 कोटी 50 लाख रुपयांपर्यंत मागणी पोहोचल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय दरमहा पाच लाख रुपये आणि घरभाड्यासाठी एक लाख रुपये देण्याचीही मागणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
"या आरोपांना मी भीक घालत नाही. माझा पोलिस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. निष्पक्ष चौकशीत सत्य समोर येईल," असे राऊत म्हणाले. तसेच, आपल्या कुटुंबाविरोधात रचले जात असलेल्या कथित षडयंत्राचा योग्य वेळी पर्दाफाश करू, असेही त्यांनी सांगितले.




