‘पुण्यात राहायचं असेल तर संस्कृती समजून घ्या; नाव खराब नको, उत्सवाला गालबोट नको’; रूपाली ठोंबरेंचा विद्यानंद बापटांना टोला
पुणे (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील विद्यानंद बापट चांगलेच चर्चेत आले आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे त्यांना मारहाणही करण्यात आली. गुरुवारी पुण्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे आणि ढोल पथकांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडत असताना बापट यांना मारहाण करण्यात आली.या घटनेनंतर काही राजकीय नेते, संघटना आणि पक्षांनी बापट यांना पाठिंबा दिला आहे, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विद्यानंद बापट यांच्यावर निशाणा साधला आहे.

रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे की, “रत्नागिरीहून 7 वर्षांपूर्वी पुण्यात नोकरीसाठी आलेल्या माणसाने पुणेकरांना गणेशोत्सव कसा साजरा करावा हे शिकवू नये. पुणे म्हणजे काय, हे पुण्यात जन्मलेल्या रक्तालाच कळतं. आमचा गणेशोत्सव, आमचा अभिमान आणि पुणेकरांचा सण पुणेकरच ठरवणार.”“नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर गणपती कार्यकर्त्यांचं बालपण गेलं आहे. पेठेत घराघरांतून आणि दुकानातून वर्गणी काढून गणपती उत्सव साजरा करण्याची 130 वर्षांची परंपरा आहे. ढोलाच्या थापेवर कार्यकर्त्यांचं बालपण गेलं आहे. त्यामुळे हा केवळ डीजेचा विषय नाही,” असंही ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
“पुण्यात राहायचं असेल तर पुण्याची संस्कृती समजून घ्यावी लागेल. तिला विरोध करून प्रसिद्धी मिळवता येणार नाही. नाहक प्रसिद्धीच्या नादात आमच्या पुण्याचं नाव खराब नको आणि आमच्या गणपती उत्सवाला गालबोट नको. पुण्याचा गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्योत्सव आहे. तो जोशात आणि आनंदात साजरा होणारच,” अशा शब्दांत रूपाली ठोंबरेंनी बापटांना सुनावलं आहे. दरम्यान, विद्यानंद बापट यांना ज्यांनी मारहाण केली, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, असंही रूपाली ठोंबरे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, आमचे सण नियमांच्या चौकटीत जोशात आणि आनंदात साजरे झाले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दहीहंडी आणि गणेशोत्सवाचा उल्लेख करत ठोंबरे म्हणाल्या की, दहीहंडी एक दिवस संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत, तर गणपती उत्सव 10 दिवस नियमांनुसार साजरा केला जातो. पेठेतील हे उत्सव वर्षानुवर्षे उत्साहात साजरे होत आहेत.विद्यानंद बापट यांच्यावर उचललेला हात कोणत्याही परिस्थितीत समर्थन करण्यासारखा नाही. हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही. मात्र, पुण्यातील सण-उत्सवांचं पावित्र्य, संस्कृती आणि परंपरा जपलीच गेली पाहिजे. प्रशासनाने कायद्याने दिलेल्या परवानगीच्या चौकटीत सण सुरक्षितपणे आणि उत्साहात साजरे होऊ द्यावेत.
सोशल मीडियावरील अर्धवट माहिती किंवा व्हायरल व्हिडिओच्या आधारावर कायद्याचे अर्थ लावले जाऊ नयेत. कायदा सोशल मीडिया ठरवत नाही, तर कायदा आणि सक्षम प्रशासन ठरवतं. त्यामुळे उपलब्ध पुरावे, प्रत्यक्ष परिस्थिती, कायदेशीर तरतुदी आणि परवानगीच्या अटी तपासूनच प्रशासनाने कारवाई करावी.“हिंसा नको, पण आमच्या संस्कृतीवरही गदा नको! कायदा पाळू, संस्कृती जपू आणि सण उत्साहात साजरे करू,” असं आवाहनही रूपाली ठोंबरे पाटील यांनी केलं आहे.




