कोल्हापूर जिल्ह्यात 'मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान' आणि 'HPV लसीकरण' मोहिमेचा शुभारंभ

कोल्हापूर जिल्ह्यात 'मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान' आणि 'HPV लसीकरण' मोहिमेचा शुभारंभ

गारगोटी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली, सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 'मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान' आणि 'जिल्हास्तरीय HPV लसीकरण मोहिमेचा' शुभारंभ आज उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे उत्साहात संपन्न झाला.

​या अभियानांतर्गत CSR उपक्रमाद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील ५ शासकीय रुग्णालयांमध्ये दि. ०९ मार्च ते १४ मार्च २०२६ या कालावधीत विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील नामवंत 20 तज्ज्ञ डॉक्टर सेवा देत असून, किमान १००० रुग्णांवर उपचार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

​प्रमुख शस्त्रक्रिया : स्त्रीरोग, नेत्ररोग (मोतीबिंदू, काचबिंदू), बालरोग, कान-नाक-घसा (टॉन्सिल, थायरॉईड), मूत्ररोग (प्रोस्टेट), ऑर्थोपेडिक (सांधे रोपण), प्लास्टिक सर्जरी, हर्निया, अपेंडिक्स, आणि पित्ताशय शस्त्रक्रिया यांसारख्या सर्व सामान्य व विशेष शस्त्रक्रियांचा यात समावेश आहे.

​उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन

जि.प. सदस्य ​मा. रोहिणी आबिटकर यांनी "ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य जपणे ही आपली जबाबदारी आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासोबतच १४ ते १५ वयोगटातील मुलींनी कॅन्सरपासून बचावासाठी HPV लस आवर्जून घ्यावी," असे आवाहन त्यांनी केले.

जि.प. सदस्य ​मा. रेश्मा देसाई यांनी सुदृढ पिढी घडवण्यासाठी मुलींचे लसीकरण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

​रोटरी क्लब प्रतिनिधीनि रोटरी क्लबने पोलिओ निर्मूलनाप्रमाणेच या शस्त्रक्रिया मोहिमेसाठीही कंबर कसली असून, आरोग्य मंत्र्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

उपसंचालक,आरोग्य सेवा ​डॉ. दिलीप माने यांनी  "आज पहिल्याच दिवशी ९८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. HPV लस पूर्णतः सुरक्षित असून गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी ही लस उपयुक्त आहे.  त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, तरी पालकांनी आपल्या पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे," असे आवाहन त्यांनी केले.

​या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अर्चना निकम, सारिका नांदेकर; पंचायत समिती सदस्य सुवर्णा ढेंगे, रुपाली कुरळे, सुनील किरोळकर, विक्रमसिंह पाटील, कल्याणी फगरे, एकनाथ जाधव, अरुणा देसाई, धनंजय लाड उपस्थित होते.

​तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे (DHO), डॉ. संजय रनवीर, डॉ. हेमलता पालेकर, डॉ. सरिता थोरात, डॉ. दीपक मेंडेकर, डॉ. पल्लवी तारळकर, डॉ. मिलिंद कदम, डॉ.वर्धन, डॉ. उत्तम मदने   आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी डॉ. राजीव प्रधान, शितल दुगे, केतन मेहता व अन्य मान्यवर उपस्थित होते.