जंतर-मंतरवर तणाव! आंदोलकांना रोखताना दिल्ली पोलिसांचा लाठीचार्ज
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आज मोठा तणाव निर्माण झाला. संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनता पक्षाच्या आंदोलकांना रोखताना दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स उभारण्यात आले असून दिल्ली पोलीस आणि आरएएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

आंदोलकांचा सकाळी ९ वाजता जंतर-मंतर ते संसद असा मोर्चा निघणार होता. या मोर्चात सुमारे ३० ते ३५ हजार लोक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मोर्चा शांततापूर्ण राहील आणि तो कोणत्याही परिस्थितीत थांबवला जाणार नाही, असा दावा केला.
गेल्या २३ दिवसांपासून उपोषणावर असलेल्या सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी तीन अटी मांडल्या आहेत. शिक्षण व्यवस्था आणि पेपरफुटीबाबत सरकारने जबाबदारी स्वीकारावी, सीजेपीच्या शिष्टमंडळाला संसदेत जाऊन आपली भूमिका मांडण्याची परवानगी द्यावी आणि ते शक्य नसल्यास खासदारांनी सफदरजंग रुग्णालयात येऊन लेखी आश्वासन द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेल्या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) तीन विद्यार्थी नेत्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. अभिनेत्री शबाना आझमी, राज्यसभा खासदार मनोज झा आणि अभिनेते प्रकाश राज यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडले.
याचवेळी, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी दिल्ली उच्च न्यायालयात पुन्हा धाव घेतली आहे. सफदरजंग रुग्णालयात वांगचुक यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध ठेवण्यात आल्याचा आरोप करत, त्यांच्या उपचारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार रुग्ण आणि कुटुंबीयांना मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सरकारकडून चर्चेचे संकेत मिळत असल्याचे सांगितले. आम्ही संवादासाठी तयार आहोत, मात्र अंतिम निर्णय आता सरकारने घ्यायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.




