मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ देण्यासाठी अंतरवालीत आले, रात्री शेतात झोपले; सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
मुंबई (प्रतिनिधी) : मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकाचा अंतरवाली सराटीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दशरथ रायकर असं या मराठा आंदोलकाचं नाव असून, ते बीड जिल्ह्यातील संगम येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. दशरथ रायकर हे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत आले होते. रात्री उशिरा ते अंतरवाली येथील एका शेतात झोपले होते. मात्र, सकाळी ते झोपेतून उठत नसल्याने त्यांना अंबड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे.

तर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं असून, आज त्यांच्या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आज धाराशिव बंद ठेवण्यात येणार आहे. सलग दोन दिवस धाराशिवमध्ये मराठा समाजाकडून आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात आलं आहे. आज जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, सरकारने लवकर प्रतिसाद दिला नाही तर येत्या काळात अधिक आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे धाराशिवमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. मराठा समाजाकडून आज जिल्हाभर बंद पाळला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून धाराशिवमध्ये मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरून आक्रमक पद्धतीने आंदोलन करत आहेत.
सर्वांनी या बंदमध्ये स्वखुशीने सहभागी व्हावं, असं आवाहन मराठा कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं आहे. सरकारने लवकर प्रतिसाद दिला नाही तर येत्या काळात अधिक आक्रमक आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे. मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला आज सहावा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी बंदला प्रतिसाद देण्याचं आवाहन करण्यात आलं असून, हा बंद शांततेच्या मार्गाने पार पाडण्याचं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे.राज्यात नोंदी निघत असलेल्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देणे, त्यांची व्हॅलिडिटी देणे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, अशा मराठा आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहेत.
या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळत असताना, आता परभणी जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता वाढताना पाहायला मिळत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. काल जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं होतं.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने या बंदचं आवाहन करण्यात आलं असून, जिल्ह्यातील विविध शहरांसह बाजारपेठांमध्ये बंदला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सेनगाव शहरासह गोरेगाव येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार आणि आखाडा बाळापूर येथील बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. सेनगाव शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे सकाळपासून शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.




