काल विद्यार्थ्यांसोबत जंतरमंतरवर, आज मोदींसोबत संसदेत! शरद पवारांच्या भेटीमागे नेमकं काय?
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत भाजपच्या एनडीए आघाडीत सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, बुधवारी दिल्लीत एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. शरद पवार यांनी संसदेत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

विशेष म्हणजे, या भेटीच्या आदल्या दिवशी शरद पवार यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. पेपरफुटीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईमुळे केंद्र सरकारवर टीका होत असताना, त्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींसोबत झालेली ही भेट अनेकांच्या उत्सुकतेचा विषय ठरली आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "माझ्याकडे या भेटीची अधिकृत माहिती नाही. मात्र, काल पवार साहेबांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. त्यामुळे त्या संदर्भात पंतप्रधानांशी चर्चा करून काही सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला असावा. यापलीकडे कोणतीही मोठी राजकीय चर्चा झाली असेल, असे मला वाटत नाही."
दरम्यान, या भेटीदरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रातील शेती आणि जलव्यवस्थापनाशी संबंधित विविध प्रश्नांवर एक निवेदनही दिल्याची माहिती समोर आली आहे.या पत्रामध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत, चौकशी प्रक्रियेला गती आणि मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच सिंचन प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट, रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण करणे, किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर करण्याबरोबरच ती प्रत्येक शेतकऱ्याला कायदेशीर हक्काने मिळावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.याशिवाय पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करून नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आणि बनावट किंवा निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.
या भेटीचा नेमका उद्देश काय होता, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी विद्यार्थी आंदोलन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दिल्लीतील राजकीय घडामोडी या सर्व पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे.




