गोकुळ पशुखाद्य सोबत फर्टिमिन प्लस मिनरल मिक्श्चर मोफत : अध्यक्ष अरुण डोंगळे

कोल्हापूर : 'महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट या पशुखाद्याचे पोते संघाकडून खरेदी केल्यास त्यासोबत फर्टिमिन प्लस या समुद्र वनस्पती अंतर्भूत मिनरल मिक्श्चरची एक किलोची बॅग मिळणार आहे. दीडशे रुपयांची ही बॅग गोकुळ संघाच्या दूध उत्पादकांना एक महिन्याच्या कालावधीसाठी पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय झाल्याची माहिती 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गायी- म्हशींचे पशुखाद्य तसेच पशुखाद्यपूरक आहाराचे उत्पादन होते. चार वर्षांपासून फर्टिमिन प्लस हे मिनरल मिक्श्चर गोकुळ दूध उत्पादकांना सहकारी दूध उत्पादक संस्थांच्या मागणीनुसार पशुखाद्याच्या वाहतुकीच्या ट्रकमधूनच त्यांच्यापर्यंत पुरवठा करीत आहे.
या फर्टिमिन प्लसचा परिणाम दुधाळ जनावरांचे दूध, फॅट आणि एसएनएफ वाढीमध्ये दिसत आहे. फर्टिमिन प्लस या मिनरल मिक्श्चरचा प्रचार व प्रसार वाढावा आणि गोकुळच्या प्रत्येक दूध उत्पादकाने या फर्टिमिन प्लसचा नियमित वापर करावा, हा या योजनेमागील संघाचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले.
महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट या पशुखाद्याच्या पोत्यामध्येच फर्टिमिन प्लसची दीडशे रुपये किमतीची एक किलो बॅग देण्यात आली आहे. 'ही योजना या वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या अखेर म्हणजेच १ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीतच उपलब्ध आहे. या योजनेमुळे सुमारे रुपये साडेतीन कोटी इतक्या खर्चाचा अधिक भार गोकुळ दूध संघावर पडला आहे. उत्तम प्रतीच्या दूध उत्पादनासाठी तसेच वंध्यत्व निवारणाच्या तक्रारीसाठी योजना लाभदायक ठरणार आहे,' असे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी सांगितले.