नीट निकालावर पुन्हा प्रश्नचिन्ह! उत्तरपत्रिकेत 522 गुण, स्कोअरकार्डवर फक्त 95
मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात नीट-यूजी परीक्षेवरील वाद अद्यापही थांबलेला नाही. पेपरफुटी, पुनर्परीक्षा आणि आता निकालातील कथित विसंगतीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. बीडमधील एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेनुसार 522 गुण मिळत असल्याचा दावा केला असताना, अधिकृत स्कोअरकार्डमध्ये त्याला केवळ 95 गुण दाखवण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे एनटीएच्या मूल्यमापन प्रक्रियेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

21 जून रोजी झालेल्या पुनर्परीक्षेचा निकाल 16 जुलैला जाहीर करण्यात आला. मात्र निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी गुणांमध्ये मोठी तफावत असल्याची तक्रार केली आहे. अन्सर कीनुसार अपेक्षित गुण आणि स्कोअरकार्डवरील गुण यात मोठा फरक असल्याचा दावा अनेकांकडून केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण असून एनटीएकडून स्पष्टीकरणाची मागणी होत आहे.
बीडमधील सोहम नितीन गवते या विद्यार्थ्याने कोणत्याही खासगी क्लासशिवाय मेहनतीने नीटची तयारी केली. त्याच्या म्हणण्यानुसार, अधिकृत अन्सर कीच्या आधारे त्याला 522 गुण मिळणे अपेक्षित होते आणि त्याबाबतचे पुरावेही त्याच्याकडे आहेत. मात्र एनटीएकडून प्राप्त झालेल्या स्कोअरकार्डमध्ये त्याला केवळ 95 गुण दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या धक्क्यानंतर सोहम मानसिक तणावात असून त्याने समुपदेशनाची मदत घेतल्याचे सांगितले जात आहे. त्याचे पालक न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत.
याचप्रमाणे वडवणी येथील ज्ञानेश्वरी अनिलकुमार पवार हिनेही गंभीर आरोप केले आहेत. परीक्षा संपल्यानंतर अन्सर कीनुसार तिला सुमारे 700 गुण मिळण्याची अपेक्षा होती. मात्र तिला मिळालेल्या ओएमआर शीटमध्येच त्रुटी असल्याचा तिचा दावा आहे. अधिकृत स्कोअरकार्डमध्ये तिला केवळ 87 गुण मिळाल्याचे दिसून आले असून, आपल्या दाव्याला प्रश्नपत्रिका आणि इतर कागदपत्रांचा आधार असल्याचे तिने सांगितले आहे.
या घटनांमुळे नीट-यूजी निकाल प्रक्रियेची पारदर्शकता आणि अचूकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर एनटीए काय भूमिका घेणार आणि या प्रकरणात पुढे काय निर्णय होणार, याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.




