रामरक्षा आंदोलनावरून नवा वाद! जैन मुनी निलेशचंद्र यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा

रामरक्षा आंदोलनावरून नवा वाद! जैन मुनी निलेशचंद्र यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा

मुंबई (प्रतिनिधी) : अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 'रामरक्षा आंदोलन' छेडले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.

अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आता दिसत नाहीत. त्यांनी नवनीत राणा यांच्या हनुमान चालीसा प्रकरणाचाही उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, रामरक्षा आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांना रामरक्षा व्यवस्थित वाचता आली नाही, असा दावा करत त्यांनी "त्यांना रामरक्षेपेक्षा कुराणाची गरज आहे," अशी टीका केली. यासोबतच त्यांनी "त्यांना शुद्धीकरणाची गरज आहे," असेही वक्तव्य केले.

राम मंदिरातील दानपेटीतील चोरीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी, "राम मंदिराची व्यवस्था आम्ही पाहून घेऊ. रामाला धन-संपत्तीची गरज नाही. मंदिर उभारताना आंदोलन केले नाही, मग आता का?" असा सवाल उपस्थित केला. तसेच, बाबरी मशीद उभारणीसंदर्भातील कथित आर्थिक गैरव्यवहारावरही भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, आज नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून रामरक्षा पठण आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भगवे ध्वज, फुलांची सजावट आणि विविध संदेश असलेले फलक लावण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय आणि धार्मिक वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.