सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये PM मोदी, राहुल-प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी ‘प्रियांकाजी कशा आहात?’ विचारताच खरगेंची कोपरखळी!

सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये PM मोदी, राहुल-प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी ‘प्रियांकाजी कशा आहात?’ विचारताच खरगेंची कोपरखळी!

मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलगी रेवती सुळे यांच्या विवाह स्वागत समारंभाला हजेरी लावली.या कार्यक्रमात अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्यासोबत बसलेले दिसले. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची शरद पवार यांच्यासोबत झालेली भेट आणि संवाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. दुसरीकडे, याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आमनेसामने आले.पंतप्रधान मोदी यांनी प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्या समोर येताच, “प्रियांकाजी, तुम्ही कशा आहात?” अशी विचारणा केली. त्यावर प्रियांका गांधी यांनी हसत “मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात?” अशी विचारपूस केली.

यावेळी मोदी यांनी, “मी तर आहे तसाच आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. मोदींची ही प्रतिक्रिया ऐकताच मल्लिकार्जुन खरगे यांनी टायमिंग साधत, “भाई साहब थोड़ा सा बदल गए हैं,” अशी कोपरखळी मारली.खरगेंची ही प्रतिक्रिया ऐकून पंतप्रधान मोदी यांनाही हसू आवरता आलं नाही. मोदी यांनी खरगेंना टाळी देत “अच्छा!” अशी प्रतिक्रिया दिली. या छोट्याशा संवादाचा व्हिडीओ आणि त्यातील नेत्यांच्या मिश्कील प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहेत.

रेवती सुळे या बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या आणि शरद पवार यांच्या नात आहेत. रेवती सुळे यांचा विवाह सारंग लखानी यांच्याशी झाला आहे.विवाहाच्या स्वागत समारंभात पंतप्रधान मोदींची उपस्थिती आणि शरद पवार यांच्यासोबतच्या त्यांच्या संवादाचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. स्वागत समारंभात शरद पवार यांनी स्वतः पाहुण्यांचं स्वागत केलं. गृहमंत्री अमित शाह हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, त्यांच्या आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियांका गांधी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.दुसरीकडे, रेवती सुळे यांच्या स्वागत समारंभापूर्वी सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या आठ सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. ही भेट सुमारे 20 मिनिटे चालली.त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची भूमिका पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. यापूर्वी 22 जुलै रोजी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.