‘शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझं जाहीर आव्हान’; असीम सरोदेंचं चॅलेंज

‘शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझं जाहीर आव्हान’; असीम सरोदेंचं चॅलेंज

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण तसेच पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या निर्णयावरून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत जोरदार युक्तिवाद केला आहे. दुसरीकडे, आपण दिलेला निर्णय शाश्वत असल्याची प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली होती. यानंतर ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी ट्विट करत राहुल नार्वेकर यांना जाहीर आव्हान दिलं आहे.

असीम सरोदे यांनी म्हटलं आहे की, राहुल नार्वेकर स्वतः वकील आहेत. त्यांना माझं जाहीर आव्हान आहे. त्यांना ज्या वकिलांचा सल्ला घेऊन यायचं असेल त्यांनी यावं. महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात माझ्यासोबत कायदेशीर जाहीर वादविवाद ठेवावा आणि त्यांचं म्हणणं लोकांना पटवून द्यावं. "अहो नार्वेकर साहेब, किती नुकसान करणार लोकशाही यंत्रणांचं? आता बस्स!" असं सरोदे यांनी म्हटलं आहे.

असीम सरोदे यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे की, विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय संपूर्णपणे बेकायदेशीर आहे, हे मी वारंवार सांगतोय आणि सांगत राहीन. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह इतर चार न्यायाधीशांनी दिलेल्या न्यायनिर्णयाच्या अनेक पानांवर राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या बेकायदेशीर आणि घटनाबाह्य निर्णयांचे उल्लेख आहेत.

कपिल सिब्बल केवळ कुणा पक्षकारांची बाजू मांडत नाहीयेत, तर संविधान आणि लोकशाहीची बाजू मांडत आहेत. मात्र संविधानाशी बेईमानी करून या देशाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या सत्तालोलुप लोकांना हे समजून घेताच येणार नाही, असंही सरोदे यांनी म्हटलं आहे.दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, कपिल सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात यातून काही सिद्ध होत नाही.

"मी जी भूमिका घेतली आहे, मी जो निर्णय दिला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिला आहे. सुप्रीम कोर्टाने जे निकष दिले, त्या निकषांच्या आत राहून आणि त्याच आधारावर हा निर्णय दिला आहे. त्यांचे जे वकील असतील ते त्यांच्या संदर्भात युक्तिवाद करतील. याचा अर्थ असा नाही की ते जे म्हणतात ते सत्य आहे.''अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं, हा पहिला प्रश्न आहे. असे बिनबुडाचे आरोप करून कोणताही फरक पडत नाही. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे. या निर्णयामध्ये कोणताही बदल होईल असं मला वाटत नाही," असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं.