देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनि बोलून दाखवली इच्छा
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चांदरम्यान, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

भरणे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांनी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वात भूमिका बजावावी, अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र ते केंद्रात गेल्यास महाराष्ट्राचं नेतृत्व कोण करणार, हा मोठा प्रश्न निर्माण होईल.
याच संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्याची धुरा सांभाळावी, अशी त्यांची वैयक्तिक इच्छा आहे.
दरम्यान, अर्थखात्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखात्याची जबाबदारी तात्पुरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली होती. अर्थसंकल्पही त्यांनीच सादर केला. मात्र त्यानंतरही अर्थखात्याचा अंतिम निर्णय झालेला नाही.
दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की, अर्थखात्याबाबत मुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा होईल आणि हा निर्णय शक्य तितक्या लवकर व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.




