"मी 'गोकुळ'ची निवडणूक लढवणार नाही!"; अध्यक्षपदाच्या चर्चांवर मंत्री हसन मुश्रीफ यांची थेट स्पष्टोक्ती
कोल्हापूर/प्रतिनिधी : "मी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवून अध्यक्ष होणार अशा चर्चा एका वृत्तपत्रातील बातमीमुळे सुरू झाल्या आहेत. मात्र, मी गोकुळच्या निवडणुकीसाठी उभा राहणार नाही," अशी स्पष्टोक्ती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. कागल येथे आयोजित विशेष कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी गोकुळ अध्यक्षपदाच्या चर्चांवर पूर्णविराम लावला.

कामगार कल्याण व शिष्यवृत्ती मंजुरी पत्रांचे वाटप
कागल विधानसभा मतदारसंघात 'जनसेवा सप्ताहा'अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किट वाटप, शिष्यवृत्ती मंजुरी पत्रे आणि घरकुल मंजुरी पत्रांच्या संयुक्त वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाहू सहकार समूहाचे प्रमुख राजे समरजितसिंह घाटगे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी विविध योजनांअंतर्गत तब्बल २,१६४ लाभार्थ्यांना ३ कोटी ६५ लाख ७९ हजार रुपयांचे अर्थसहाय्य व लाभ मंजूर करण्यात आले.
"कामगारांची मुले डॉक्टर, आयएएस बनली पाहिजेत" - हसन मुश्रीफ
भाषणात पुढे बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "बांधकाम कामगारांचे राहणीमान व जीवनमान उंचावले पाहिजे. त्यांची मुले दर्जेदार शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर आणि आयएएस-आयपीएस बनली पाहिजेत. कामगारांनी नूतनीकरण वेळेत करण्यासाठी समितीने सजग राहावे. तसेच कामगार संघटनांचे प्रश्न आणि योजनांचा अभ्यास करून त्या पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी मी आणि समरजितसिंह घाटगे मिळून प्रयत्न करू."
'केडीसीसी' बँकेच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज - समरजितसिंह घाटगे
शाहू समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी कागल तालुका योजनांच्या अंमलबजावणीत राज्यात आघाडीवर असल्याचे सांगितले.
"बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचे सात हजार प्रस्ताव प्रलंबित आहेत. या प्रश्नावर आम्ही एकत्रित काम करू. तसेच केडीसीसी बँक आणि राजे विक्रमसिंह घाटगे कागल सहकारी बँकेच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू," असे घाटगे म्हणाले.
यावेळी कागल तालुक्यातील विविध स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.




