"बेस्ट संपावर प्रसाद लाडांचा संताप; ‘मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्यांवर मेस्मा लावा’"
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरून राजकीय वातावरण तापलं आहे. बेस्ट सेवा विस्कळीत झाल्याने लाखो मुंबईकरांना मोठा फटका बसला असून, या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी संपकर्त्यांवर आणि विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे.प्रसाद लाड यांनी हा संप पूर्णपणे अनधिकृत असल्याचा दावा करत, काही घटक जाणीवपूर्वक परिस्थिती चिघळवत असल्याचा आरोप केला. मुंबईत सध्या परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेचा काळ सुरू असताना नागरिकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच काही ठिकाणी बसवर दगडफेक झाल्याच्या घटनांचा उल्लेख करत, अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर मेस्मा कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या संपामागे उबाठा, काँग्रेस आणि डाव्या संघटनांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, बेस्टमधील कंत्राटी बस व्यवस्था बंद करून त्या ठिकाणी थेट बेस्ट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही लाड यांनी राज्य सरकारकडे केली.
काही डेपोमधून बसेस पुन्हा रस्त्यावर उतरू लागल्याचा दावा करत, पुढील काही तासांत परिस्थिती पूर्ववत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.बेस्ट सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन आणि कर्मचारी यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन करत नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.




