पोस्टल पेन्शनधारकांसाठी 20 जुलैला गोवा येथे पेन्शन अदालत
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोस्टल पेन्शनधारकांच्या तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन, पणजी यांच्यावतीने सोमवार, 20 जुलै रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्तर जनरल कार्यालय, गोवा रिजन, पणजी-403001 येथे पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीचा लाभ गोवा राज्यासह सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र निवृत्तिवेतनधारकांना मिळणार आहे.

टपाल विभागातून निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारींचा या अदालतीत विचार करण्यात येणार आहे. टपाल विभागाचे निवृत्तीवेतनधारक ज्यांचे तीन महिन्याच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल.
पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे जसे की वारसा प्रमाणपत्र आणि धोरणात्मक बाबींसह प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्ती वेतनधारकांनी प्रपत्रामध्ये आपले अर्ज महेश एन., वरिष्ठ लेखा अधिकारी/ सचिव पेन्शन अदालत, पोस्टमास्तर जनरल कार्यालय, गोवा रिजन पणजी -403001 यांच्या नावे 6 जुलै रोजी किंवा यापूर्वी पाठवावेत. तसेच अर्ज accts.goa@indiapost.gov.in ई-मेलवरही पाठविता येतील. 6 जुलैनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेन्शन अदालतीत विचार करण्यात येणार नाही.




