नंदवाळमध्ये साडेतीनशे दिंड्यांचा जयघोष! आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

नंदवाळमध्ये साडेतीनशे दिंड्यांचा जयघोष! आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील आषाढी एकादशी यात्रा लाखो भाविकांच्या उत्साही उपस्थितीत पार पडली. या यात्रेसाठी जिल्हाभरातून तब्बल साडेतीनशेहून अधिक दिंड्या नंदवाळमध्ये दाखल झाल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळापासून सुरू झालेली भाविकांची मांदियाळी शनिवारी रात्री उशिरापर्यंत कायम होती.



पहाटे तीन वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत आणि शशिकांत खोत यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा पार पडली. तर शिंदेवाडी येथील विलास चव्हाण आणि मनीषा चव्हाण यांना अभिषेक व महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला. पहाटे काकड आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.

दिवसभरात विठ्ठलनामाचा गजर करत येणारे भाविक, भगव्या पताका, तुळशी वृंदावन आणि टाळ-मृदंगाच्या तालावर संतांचे अभंग गात नंदवाळचा परिसर दुमदुमून गेला होता. वारीत ठिकठिकाणी भाविक आनंदाने फुगड्यांचे फेर धरताना पाहायला मिळाले.

तसेच भक्तीसोबतच सामाजिक भान जपताना विविध संस्थांकडून वारकऱ्यांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. तर स्वच्छता मोहिमेअंतर्गत दिंडी मार्ग आणि मंदिर परिसर स्वच्छ ठेवला

पुईखडी मार्गे नंदवाळकडे प्रस्थान करताना संपूर्ण परिसर अभंग, फुगड्या आणि विठ्ठल नामाच्या घोषाने दुमदुमून गेला होता.

लाखो भक्तांच्या उपस्थितीत आणि टाळ-मृदंगाच्या जयघोषात नंदवाळमधील हा आषाढी सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.