नंदवाळमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना फराळ वाटप; अखिल भारत हिंदू महासभेचा स्तुत्य उपक्रम

नंदवाळमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना फराळ वाटप; अखिल भारत हिंदू महासभेचा स्तुत्य उपक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण महाराष्ट्र विठूरायाच्या भक्तीत लीन झाला होता. याच भक्तिमय वातावरणात शनिवारी अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने नंदवाळ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात एक विशेष सेवा उपक्रम राबवण्यात आला.

आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या हजारो वारकरी, भाविक आणि भक्तांसाठी हिंदू महासभेकडून प्रेमपूर्वक फराळाचे वाटप करण्यात आले. उपवासधारक भाविकांनी या उपक्रमाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अखिल भारत हिंदू महासभेच्या या सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमाचे वारकऱ्यांनी मनापासून स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.

धार्मिक परंपरांचे जतन करणे, भक्तसेवा आणि हिंदू समाजात सामाजिक ऐक्य व सेवाभाव वाढवणे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अखिल भारत हिंदू महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी अत्यंत उत्साहाने व सेवाभावाने सहभाग घेतला.

कार्यक्रम प्रसंगी भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या चरणी सर्व भाविकांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्कराज राजेश क्षीरसागर,  शिला अशोक सोनुले, नितीन वाडीकर, दिपा काटकर, प्रदीप राठोड, जमनादास पटेल, अशमुखभाई शहा, मधुकर रामाणे, प्रताप जाधव, माधवी गवंडी, सचिन पाटील तसेच आजी-माजी नगरसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.