कागल येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल ठरणार देशातील सर्वात सुंदर पूल: मंत्री हसन मुश्रीफ
२९५ कोटी निधीतून साकारणाऱ्या ५० पिलरच्या उड्डाणपुलाचा पायाभरणी समारंभ थाटात संपन्न; दीड वर्षात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; स्थानिकांचे विस्थापन टळणार
कागल: "राष्ट्रीय महामार्गावर कागल शहरातून जाणारा उड्डाणपूल हा नेहमीच्या भरावाच्या बोगद्याऐवजी पिलरचा व्हावा, ही कागलकरांची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ मान्य केली. हा २९५ कोटींचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर देशातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पूल ठरेल," असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल येथे साकारणाऱ्या १ किलोमीटर लांबीच्या व ५० पिलर असलेल्या या उड्डाणपुलाचा पायाभरणी समारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

नागरिकांना त्रास न देता दर्जेदार कामाचे निर्देश
पूर्वीच्या कंत्राटदाराने काम सोडल्यानंतर आता नव्या 'धारीवाल' कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले आहे. कामाच्या गतीचे कौतुक करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, "काम पूर्ण होत असताना कागल शहरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता कंत्राटदाराने घ्यावी. युटिलिटी शिफ्टिंगची कामे काळजीपूर्वक पार पाडावीत. चांगले आणि दर्जेदार काम करणाऱ्यांच्या पाठीशी प्रशासन व नागरिक खंबीरपणे उभे राहतील.
पिलरच्या उड्डाणपुलामुळे होणारे प्रमुख फायदे:
-
वाहतूक कोंडीतून मुक्ती: स्थानिक व महामार्गावरील वाहतूक वेगळी झाल्याने अपघातांचे प्रमाण घटेल आणि वाहतूक सुरळीत होईल.
-
व्यावसायिकांचे संरक्षण: महामार्गालगतचे लहान व्यावसायिक, हातगाडीवाले, फळविक्रेते आणि रहिवाशी विस्थापित होण्यापासून वाचतील.
-
शेतकऱ्यांना दिलासा: कर्नाटकातून येणारी वाहने आणि स्थानिक साखर कारखान्यांना होणारी ऊस वाहतूक विनाअडथळा सुरू राहील.
-
भूसंपादनाची बचत: नवीन बस स्थानकासाठी वेगळे भूसंपादन करावे लागणार नाही.
या कार्यक्रमास राष्ट्रीय महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष प्रताप (भैय्या) माने, नगराध्यक्षा सविता माने, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, अमित पिष्टे, विवेक लोटे, नवाज मुश्रीफ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




