मुंबई पोलीसांना धमकीचा फोन ; 400 किलो RDX वापरून मोठ्या स्फोटाचा इशारा

मुंबई पोलीसांना धमकीचा फोन ; 400 किलो RDX वापरून मोठ्या स्फोटाचा इशारा

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत घातपाताची गंभीर धमकी मिळाल्याने पोलिस दल सतर्क झाले आहे. शुक्रवारी वाहतूक पोलीसांच्या हेल्पलाईनवर आलेल्या एका फोनमधून, शहरात 34 आत्मघाती हल्लेखोर (ह्युमन बॉम्ब) घुसल्याचा दावा करण्यात आला. यामध्ये 34 वाहनांमध्ये सुमारे 400 किलो RDX स्फोटके ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतः ला लष्कर - ए - जिहादी या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले. या स्फोटांमुळे तब्बल एक कोटी लोकांचा बळी जाऊ शकतो, अशी धक्कादायक भाषा वापरण्यात आली होती. ही धमकी अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मिळाल्याने प्रशासन आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलीसांनी या धमकीची गंभीर दखल घेतली असून शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद हालचाल, वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे, आणि त्याच्या लोकेशनचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.