निशा साबळेनं राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले; फडणवीसांना राहुल गांधींचं पत्र
मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी पुण्यात 22 ऑगस्टला ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पुण्यातील मांजरी येथे सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील आंदोलक विद्यार्थिनी निशा साबळे हिने राहुल गांधी यांना एक निवेदन दिलं होतं. हे निवेदनदेखील लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.

राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनी निशा साबळे सहभागी झाली होती. तिने आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे प्रश्न पोटतिडकीने मांडले होते. निशा साबळेने मांडलेल्या समस्यांसह राज्यात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी 10 दिवसांहून अधिक काळापासून उपोषण करत आहेत. पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनीने सांगितलं की, वसतिगृहात वास्तव्यासाठी 30 वर्षांची वयोमर्यादा घालण्यात आली आहे. तसेच अपमानास्पद नियम लागू आहेत. मुलींसाठी प्रेग्नन्सी टेस्टसारख्या अमानवी गोष्टी लागू असल्याचा आरोपही विद्यार्थिनीने केला.
माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी 22 ऑगस्ट रोजी ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न आणि समस्या ऐकून घेतल्या. त्याचवेळी त्या मुलींना ‘तुम्ही मला का बोलावलं नाही?’ असं म्हणत त्यांनी त्यांना मोठा धीर दिला होता, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
दुर्गम भागातील गावखेड्यांतून आलेले विद्यार्थी दान मागत नाहीयेत, ते त्यांचा अधिकार मागत आहेत. तुम्ही त्यांना व्यक्तिगतरित्या भेटून त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाल, अशी अपेक्षा असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये अन्न, स्वच्छता आणि वैद्यकीय सेवांचा तुटवडा आहे. सर्पदंशामुळे मुलांचा मृत्यू होत असल्याचंही राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केलं आहे. महिलांसाठीच्या सुविधांची स्थितीही खराब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विद्यार्थिनींच्या फिटनेस टेस्टच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या प्रेग्नन्सी टेस्टची माहिती मिळताच धक्का बसला, असं राहुल गांधी म्हणाले. या नियमामुळे महिलांच्या सन्मानावर आणि त्यांच्या मानवतेवर आघात होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.




