राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली? जयंत पाटलांच स्पष्टीकरण

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली? जयंत पाटलांच स्पष्टीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. विलीनीकरणावरून दोन्ही राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळे दावे करत होते. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना उमेदवारी देण्यावरून महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला. यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्टपणे खुलासा करत यापुढे विलीनीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही. ही चर्चा आता थांबली आहे असं त्यांनी म्हटलं.

विधान भवनात पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली आहे. आता चर्चा पुढे जाणे शक्य नाही. आम्ही यावर कुणाशी चर्चाही करत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत हे समजून घेणारा नेताच नसल्यामुळे विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे आणि यापुढे विलीनीकरणाची शक्यता नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले.

तसेच राज्यसभेच्या एका जागेसाठी कुणी विरोध केला असे नाही. सध्या पक्षाच्या विद्यमान सदस्यांबद्दल पुन्हा जागेची मागणी पक्षनेतृत्वाने करणे यात काही चुकीचे आहे असं वाटत नाही. परंतु आमच्या कुठल्या नावाला त्यांच्याकडून विरोध झाला किंवा अन्य काही आक्षेप होते असं मला वाटत नाही. विलीनीकरणाची चर्चा अजितदादांच्या आग्रहाने झाली होती. अजितदादांच्या निधनामुळे ती चर्चा पूर्ण झाली नाही. आता विलीनीकरणाची शक्यता नाही. विलीनीकरण हा मुद्दा पूर्णपणे बाजूला गेला आहे. त्यामुळे आमच्या दोन्ही मित्रपक्षाला यात काही शंका नाही असंही जयंत पाटील यांनी दावा केला.