भोंदू बाबाचा काळा कारभार उघड! अशोक खरातविरोधात ईडीचे 3000 पानांचे आरोपपत्र

भोंदू बाबाचा काळा कारभार उघड! अशोक खरातविरोधात ईडीचे 3000 पानांचे आरोपपत्र

मुंबई (प्रतिनिधी) : धर्माच्या नावाखाली चमत्कारांचे आमिष दाखवत भक्तांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात त्याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांचा, फसवणुकीच्या पद्धतींचा आणि मनी लॉन्ड्रिंगच्या जाळ्याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला असून, 30 साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

ईडीच्या आरोपपत्रानुसार, अशोक खरात स्वतःला भगवान शिवाचा अवतार असल्याचे सांगत भक्तांमध्ये प्रभाव निर्माण करायचा. धार्मिक कार्यक्रमांमध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून तो कथित चमत्कार घडवत असल्याचा आभास निर्माण करायचा. रिमोट कंट्रोलने चालणारे कृत्रिम साप, वाघाच्या कातड्याचा वापर आणि इतर साधनांच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. तसेच काही महिला भक्तांना गुंगीचे औषध दिल्याचाही उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.

भक्तांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी तो विविध प्रकारच्या धार्मिक वस्तूंना चमत्कारी शक्ती असल्याचा दावा करत असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. साध्या चिंचेच्या बिया लाखो रुपयांना, तर खडे आणि मधाच्या बाटल्या मोठ्या रकमेत विकून त्याने अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तपास यंत्रणेनुसार, श्रीमंत व्यावसायिक हे त्याचे प्रमुख लक्ष्य होते. त्यांच्यावर दैवी संकट, व्यवसायातील नुकसान किंवा कुटुंबावर अनर्थ ओढवेल अशी भीती दाखवून 'विशेष पूजा' आणि देणग्यांच्या नावाखाली मोठ्या रकमा घेतल्या जात असल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.

या कथित गैरव्यवहारातून मिळालेला पैसा लपवण्यासाठी तब्बल 142 बेनामी बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. सहकारी पतसंस्था, कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या माध्यमातून पैशांची कथित अफरातफर करून तो पैसा रिअल इस्टेट आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.

ईडीच्या या विस्तृत आरोपपत्रानंतर अशोक खरात यांच्या कथित आर्थिक व्यवहारांवर आणि मालमत्तांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया आणखी वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या आरोपांवर न्यायालयाचा अंतिम निर्णय येणे अद्याप बाकी आहे.