अभिनेता सयाजी शिंदे यांनी सरकारला खडेबोल का सुनावले..? नेमकं प्रकरण काय..?

अभिनेता सयाजी शिंदे यांनी सरकारला खडेबोल का सुनावले..? नेमकं प्रकरण काय..?

नाशिक - समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाच्या ध्येयाने त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून ती झाडे जगवली आहेत. कुठेही वृक्षतोड सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तर ते तिथे धाव घेऊन ती थांबवण्याचा प्रयत्न करतात. अलीकडेच अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. सरकार आपलं असूनही बेजबाबदारपणे वागत आहे. माझ्या डोळ्यांदेखत झाडं कापली जात आहेत, हे सहन होणार नसल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान तपोवन परिसरातील काही झाडे तोडण्याचा प्रशासनाचा मानस असल्याची चर्चा आहे. याला सयाजी शिंदे यांनी कडाडून विरोध केला आहे. “कुंभमेळ्यासाठी झाडे तोडणे दुर्दैवी आहे,” म्हणत त्यांनी सत्तेतील स्वतः च्याच सरकारला खडेबोल सुनावले. १०० जणांचे बलिदान द्यावे लागले तरी नाशिकमधील एकही झाड तोडू देणार नाही. लोक पेटून उठतील, मी फक्त निमित्त असेन. झाड तोडून दहा झाडे लावू हे विधान फालतू आहे. 

सयाजी शिंदे पुढे म्हणाले, मी सध्या तिथे जात नाही, पण मनिष बाविसकर, मनोज साठे, शेखर गायकवाड ही आमची माणसं तिथे आहेत. जर एक झाड तोडायला गेलात तर आम्ही आमची १०० माणसं तिथे उभी करू असेही ते म्हणाले. 

दरम्यान, कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनाला शासनाची मंजुरी मिळाली आहे. हा ६६.१५ किमी लांबीचा प्रकल्प असून त्यासाठी ३,६५९ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये सुमारे दोन कोटी भाविक येण्याचा अंदाज शासनाने व्यक्त केला आहे.