घरकूल लाभार्थ्यांनी 'या' तारखेपर्यंत घरकूल पूर्ण करून घ्यावीत - कार्तिकेयन एस.
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य आवास योजनेतील सर्व लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिशन 50,000 घरकुल 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याची मोहीम सुरु आहे. तरी, घरकुले मंजूर झालेल्या व घरकूल बांधकाम सुरु नसलेल्या लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम सुरू करून 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करून घ्यावीत. हे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना टप्पा - 2 (ग्रामीण) अंतर्गत सन 2024 - 25 व 2025 - 26 मध्ये एकूण 53,836 घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी 30,881 घरकुलांचे बांधकाम सुरू असून 22,955 घरकुले अद्याप सुरु झालेली नाहीत. पावसाळ्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम सुरू करता आले नाही तरी आता पावसाळा संपल्यामुळे तात्काळ कामाला लागण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
शुभारंभ मोहीमेस प्रतिसाद -
जिल्हा परिषदेमार्फत 10 नोव्हेंबर 2025 रोजी एकाच दिवशी सुरु नसलेल्या घरकुलांसाठी पायाभरणी / शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून10,308 लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामाला प्रारंभ केला आहे.
आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा - 2 अंतर्गत 3,542 घरकुले पूर्ण झाली असून 50,294 घरकुले अपूर्ण आहेत. तसेच राज्य आवास योजनेतील 4,795 घरकुले अद्याप अपूर्ण आहेत.
योजनेअंतर्गत निधी वितरणाची माहिती -
पहिला हप्ता: 50,287 लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग
दुसरा हप्ता: 31,130 लाभार्थ्यांना वितरित
तिसरा हप्ता: 13,436 लाभार्थ्यांना वितरित
- प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निधी उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण येणार नाही, आणि कामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने निधी दिला जाणार आहे.
- लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडवणूक अथवा गैरप्रकार झाल्यास 0231-3580295 या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच संबंधित पंचायत समितीतील गटविकास अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- मिशन 50,000 अंतर्गत घरकुल प्रगतीचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून दर मंगळवारी घेतला जातो.
- घरकुल शुभारंभ मोहिमेत 10,500 घरकुलांचे बांधकाम सुरु झाले आहे.
- प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी तालुका स्तरावर सर्व पंचायत समित्यांना भेट देऊन संबंधित अधिकारी - कर्मचार्यांची बैठक घेऊन 31 डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.




