'लॉकडाऊन'बाबत अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना आणि अनेक देशांमध्ये आणीबाणीची स्थिती असताना, भारताने मात्र आपले इंधन व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवले आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून, सध्या सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या लॉकडाऊनबाबतच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जगभरात युद्धाची परिस्थिती असताना इंधन दरवाढीचे संकट उभे ठाकले आहे. अशा कठीण काळात भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. आपल्या शेजारील देशांमध्ये इंधनाच्या कमतरतेमुळे शाळा, कार्यालये आणि संस्था बंद करण्याची वेळ आली आहे, मात्र भारताने उत्तम व्यवस्थापनामुळे अशी वेळ येऊ दिली नाही."
सोशल मीडियावर देशात लॉकडाऊन लागू होणार असल्याची अफवा पसरवली जात असल्याने पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, "मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारताच्या शेजारच्या देशात शटडाऊनची परिस्थिती आली आहे. मात्र, आपल्या केंद्र सरकारने उत्तम व्यवस्था केली आहे. लोकांनी विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये. आपल्याकडे एक महिना पुरेल एवढा इंधन साठा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. लॉकडाऊन लागणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. याबद्दल खोटी माहिती पुरवणे गुन्हा ठरेल", असाही त्यांनी इशारा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी जनतेला विनंती केली आहे की, त्यांनी दररोज ज्याप्रमाणे आवश्यक तेवढेच इंधन भरता, तसेच भरावे. कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये. देशात घरगुती गॅस किंवा पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता भासणार नाही, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.




