शिवाजी कोण होता, पुस्तकावर बंदीची मागणी; संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरून वाद वाढला
बुलढाणा (प्रतिनिधी) : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद राज्यभर पेटताना दिसत आहे. या प्रकरणात बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी दि. २८ रोजी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात प्रकाशक प्रशांत आंबी यांचाही सहभाग असणार आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर ‘शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे जाहीर वाचन केले जाणार आहे. याबाबत आज माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. आज होणाऱ्या या पुस्तक वाचनाला ते हजेरी लावणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

संजय गायकवाड बोलताना म्हणाले, पोलिसांनी सांगितलेल्या कायद्याचा सन्मान आम्ही केला. आमचा कार्यक्रम रद्द केला, त्यांचाही कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला, कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या नावाखाली, परंतु असं असताना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याकरता जाणून बुजून जे पुस्तक छापलं, त्याच्या 20 लाख प्रति विकल्या, त्यानंतर आता इथे येऊन पुस्तक वाचण्याची आवश्यकता काय आहे. आम्ही त्या पुस्तक वाचनाला जाणार आहे, आम्ही ते जाऊन पुस्तक ऐकणार, आम्ही खाली तिथे समोर जाऊन बसणार, विनयशिलतेने तिथे बसून आम्ही सगळ्या गोष्टी ऐकणार, आणि त्यामध्ये जर पुस्तक वाचताना त्यांनी शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करणार, पण जर एकेरी भाषेत महाराजांच्या नावाचा उल्लेख करत आमच्या सगळ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला, तर मग मात्र शिवभक्तांच्या भावांना अनावर झाल्या, तर याची सगळी जबाबदारी त्या पुस्तक वाचनाच्या आयोजकाची आणि पुस्तक वाचणाऱ्याची असेल, अंसेही पुढे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करावा या मागणीवरती बोलताना संजय गायकवाड म्हणाले, अशी कुठलीही मागणी मी केलेली नाही, लेखी देखील केली नाही आणि कोणत्याही मीडियावर देखील अशी मी मागणी केलेली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तर आज होणाऱ्या पुस्तक वाचणाच्या मोर्चासाठी उभारण्यात आलेला मंडप आमदाराच्या दहशतीने काढून टाकण्यात आला या आंदोलकांच्या आरोपावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले, आमची कुठली त्या दहशत नाही. एखादा कोल्हापूरचा कोणी लांडगा इकडे येईल, इकडे येऊन कुई, कुई करेल, आमच्या गावात आग लावेल, विनाकारण कायदा सुव्यवस्था निर्माण करेल, असं त्या मंडप चालकाला वाटलं, इथे देखील माझ्या मंडपामध्ये शिवरायांचे अपमान होणार म्हणून त्याने तो मंडप काढून नेला, त्याला सांगायची काय गरज आहे, असं गायकवाड म्हणालेत.




