खरे हिंदूद्रोही आणि देशद्रोही भाजपवालेच!; सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात चोरी केल्याचा आदित्य ठाकरेंचा खळबळजनक आरोप

खरे हिंदूद्रोही आणि देशद्रोही भाजपवालेच!; सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात चोरी केल्याचा आदित्य ठाकरेंचा खळबळजनक आरोप

मुंबई: "खरे हिंदूद्रोही आणि खरे देशद्रोही हे भाजपवालेच आहेत. हिंमत असेल तर भाजपने अयोध्येमध्ये राम मंदिराला का लुटले, यावर प्रश्न विचारून दाखवावा," अशा अत्यंत तिखट शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे. राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बनले असून भाजपने ना शासन केले ना कायदा आणला, तरीही ते याचे श्रेय घेऊ पाहत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. उत्तर प्रदेशातील मंदिरे पाडल्याचा आणि मुंबईत मुंबादेवी परिसरात कॉरिडॉरच्या नावाखाली जमिनी हिरावून घेण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करत त्यांनी याविरोधात लढण्याचा इशारा दिला.

सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात चोरी
भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना आदित्य ठाकरे म्हणाले, "भाजप सध्या बहुमताच्या आकड्याच्या खाली असून देशाच्या जनतेने त्यांना २४० वर आणले आहे. अयोध्येमध्ये जी लूट झाली, तिथूनच भाजपने पैसा चोरला आहे. उज्जैनमधील महाकाल कॉरिडॉरमधूनही भाजपने पैसा चोरला. राम मंदिर बनल्यानंतर भाजपने जी ट्रस्ट बसवली, त्या दानपेटीतून चक्क सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर धोतर लावून चोरी करण्यात आली," असा खळबळजनक आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

बाबासाहेबांच्या संविधानाऐवजी भाजपला स्वतःचे संविधान आणायचे आहे
भाजपच्या मूळ हेतूंवर शंका उपस्थित करत आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, "भाजपच्या मनात आपल्या संविधानाबद्दल प्रचंड घृणा आहे आणि त्यांना हे संविधान बदलायचे आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाऐवजी त्यांना स्वतःचे म्हणजेच भाजपचे संविधान या देशात आणायचे आहे. यासाठीच डीलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) असो किंवा संविधान बदलण्याचे इतर कार्यक्रम असोत, ते राबवले जात असून त्यासाठीच खासदार आणि आमदारांची खरेदी-विक्री केली जात आहे."

ईडी, सीबीआय आणि आयटी हे भाजपचे पोपट
केंद्रीय तपास यंत्रणांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ठाकरे म्हणाले की, "सीबीआय आणि इनकम टॅक्स (आयटी) हे केवळ भाजपचे पोपट आहेत. अंमलबजावणी संचालनालयाला (ED) चंपत राय दिसत नाहीत, तर आता त्यांना अभिनेते शेखर सुमन दिसतील." सीबीआय चंपत राय किंवा मिश्रा यांच्या घरी चौकशीसाठी का जात नाही आणि या सर्व प्रकारात भाजप व पंतप्रधानांची भूमिका काय आहे, असा जाहीर सवाल त्यांनी उपस्थित केला.


लँड जिहाद' आणि बदललेल्या भाजपवर टीका
भाजप नेत्यांनी अभिनेता आमिर खानला लक्ष्य केल्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, "आमिर खानचे फोटो तर थेट पंतप्रधान मोदींसोबत आहेत आणि त्यांची चांगली मैत्री आहे. मग उज्जैनमध्ये 'लँड जिहाद' कोणी केला? तर तो भाजपच्याच मुख्यमंत्र्यांनी केला असून उज्जैनच्या पावन भूमीला भाजपने लुटले आहे."

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या काळातील जुनी भाजप आता बदलली असून, सध्याचे भाजपचे प्रमुख चेहरे हे 'इथेनॉल मिक्सिंग' वाले म्हणजेच भेसळयुक्त चेहरे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. देशाच्या सुरक्षेला आणि लोकशाहीला धोका असणाऱ्या या राजकीय "भेसळ" सारख्या विषयावर आता देशात खुली चर्चा होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.