पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरण : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरण : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, याप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीसह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पुण्यातील स्वारगेट पोलिसांनी ही कायदेशीर कारवाई केली आहे. खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी काही व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. यामध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी आणि मनसेचे माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांच्या नावांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले होते. या व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून या घटनेने पुणे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या संशयितांवर गुन्हा दाखल
स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल केदारी, सुनील अय्यर व त्यांचा मुलगा, रघु गौडा, सुनील बोरा, राजन सेठीया, हमीद भाई शेख व त्यांचा मुलगा, बाळासाहेब शेडगे व त्यांची पत्नी, रवींद्र धंगेकर व त्यांची पत्नी, शाम कोळपकर आणि शुभम अशा १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. खलील शेख यांनी केलेल्या कामाचे कोट्यवधी रुपये अनेकांकडे थकले होते. वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळत नसल्याने ते प्रचंड आर्थिक विवंचनेत होते. त्यातच बाजारातून व्याजाने घेतलेल्या पैशांमुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढला होता. थकीत पैसे न मिळणे आणि त्यातच मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रस्त होऊन त्यांनी गुरुवारी (१६ जुलै) दुपारी गुलटेकडी येथील राहत्या घरात गळफास लावून आपले जीवन संपवले.

नेमके प्रकरण काय?
६५ वर्षीय खलील शेख यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नी सुल्ताना खलील शेख यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली होती. पुष्टी म्हणून त्यांनी शेख यांनी मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पोलिसांकडे सोपवला.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जागेवर एक बांधकाम प्रकल्प सुरू करण्यासाठी 'उत्कर्ष असोसिएट्स' नावाची कंपनी स्थापन करण्यात आली होती. यामध्ये रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे आणि खलील शेख यांच्यासह आणखी चार जण भागीदार होते. वक्फ बोर्डाची जागा विकत घेऊन त्यावर काम सुरू करण्यासाठी बँकांकडून मोठी कर्जे घेण्यात आली होती. मात्र, नंतर वक्फ बोर्डाकडून या जागेला स्थगिती मिळाली आणि हे प्रकरण न्यायालयात गेले. काम रखडल्यामुळे कंपनी कायदेशीर कचाट्यात सापडली आणि खलील शेख यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा वाढला.

व्हिडिओमधील गंभीर आरोप
खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये आपली आर्थिक कोंडी आणि त्याला कारणीभूत असलेल्या बाबींवर प्रकाश टाकला आहे. भागीदार असलेल्या 'उत्कर्ष असोसिएट्स' कडून आपले हक्काचे ५० लाख रुपये येणे बाकी होते, ज्यात २० लाखांचे एक आणि प्रत्येकी १५ लाखांची दोन बिले समाविष्ट होती. हे पैसे न मिळाल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ते दरमहा ४ टक्के दराने व्याज भरत होते. या गंभीर परिस्थितीकडे रवींद्र धंगेकर पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेख यांनी केला.

तसेच, मनसेचे बाळासाहेब शेडगे यांच्यावर थेट धमकावल्याचा आरोप करताना शेख व्हिडिओमध्ये म्हणाले, "शेडगे माझे पैसे तर देत नाहीच, उलट दादागिरी करत आहे. मला पुण्यात जगू न देण्याची आणि मार्केटमध्ये काम करू न देण्याची धमकी त्याने दिली होती. माझ्या पश्चात माझ्या मुलांच्या जीवालाही त्याच्याकडून धोका होऊ शकतो. जर माझ्या कुटुंबाला काही त्रास झाला, तर त्याला बाळासाहेब शेडगे आणि त्याचा मुलगाच जबाबदार असतील." या व्हिडिओच्या आधारे पोलीस आता पुढील कायदेशीर पावले उचलत आहेत.