कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात 'दिशा' समितीची महत्वपूर्ण बैठक; केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा घेतला आढावा

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात 'दिशा' समितीची महत्वपूर्ण बैठक; केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा घेतला आढावा

कोल्हापूर: केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात 'दिशा' (DISHA) समितीची एक अत्यंत महत्वपूर्ण बैठक पार पडली. खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज, जिल्हाधिकारी आणि दोन्ही महानगरपालिकांचे आयुक्त यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सुमारे ७ तास चाललेल्या या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले की, केंद्र सरकारच्या ७९ हून अधिक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अगदी ग्रासरूट लेव्हलपर्यंत (तळागाळातील लोकांपर्यंत) कशी पोहोचत आहे, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, आरोग्य, पंतप्रधान सडक योजना आणि पाणी पुरवठा यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा समावेश होता. आगामी लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी तिन्ही खासदारांनी विविध विभागांकडून प्रस्ताव मागवले आहेत.

तर खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या विविध योजना राबवण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सध्या राज्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असून ही अतिशय समाधानकारक बाब आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन तिन्ही खासदारांच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्राच्या योजनांचा लाभ १००% लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.