शिवसेना (शिंदे गट)तर्फे सचिन पाटील यांचा जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
करवीर (विश्वनाथ मोरे) - शिरोली दुमाला येथील लोकनियुक्त सरपंच सचिन विश्वासराव पाटील यांनी पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून सर्वसाधारण गटासाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षामार्फत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा करवीरचे प्रांताधिकारी मौसमी चौगले यांच्याकडे शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमणमळा, कसबा बावडा येथे आवश्यक कागदपत्रांसह सुपूर्द करण्यात आला. अर्ज दाखल करताना कोणताही गाजावाजा करण्यात आला नाही.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील यांच्यासह सूचक व अनुमोदक उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेतील सर्व नियमांचे पालन करत अर्ज सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सचिन पाटील हे सध्या शिरोली दुमाला ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यरत आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजाचा अनुभव लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले.
पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली असून, आगामी काळात प्रचाराच्या पुढील टप्प्याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.




