'कोल्हापुरी कट्टा’ उपक्रमातून स्थानिक व्यावसायिकांना व्यासपीठ - मधुरिमाराजे छत्रपती

'कोल्हापुरी कट्टा’ उपक्रमातून स्थानिक व्यावसायिकांना व्यासपीठ -  मधुरिमाराजे छत्रपती

कोल्हापूर (प्रतिनिधी) - खाद्यसंस्कृती आणि कला आपल्या कोल्हापूरच्या ओळखीचा अभिमान आहे. ‘कोल्हापुरी कट्टा’ सारखे उपक्रम स्थानिक व्यावसायिकांना व्यासपीठ देतात आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करतात. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या परंपरेची जाणीव होते असे प्रतिपादन मधुरिमाराजे छत्रपती यांनी काढले. महाराणी लॉन्स येथे आयोजित ‘कोल्हापुरी कट्टा’ या भव्य प्रदर्शनाच्या उदघाटनवेळी त्या बोलत होत्या.त्यांच्यासह राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेच्या अध्यक्षा व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. या उपक्रमास कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोल्हापूरच्या मातीतील अस्सल चव, स्थानिक संस्कृती आणि आधुनिक फॅशनचा सुंदर संगम या प्रदर्शनात अनुभवायला मिळाला.

दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात कोल्हापूरच्या खवय्यांनी पारंपरिक व आधुनिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला, तर फॅशन, लाईफस्टाईल व मनोरंजनाच्या विविध दालनांनी नागरिकांना भुरळ घातली. या कार्यक्रमाचे आयोजन स्मिता पाटील आणि पार्थ वणकुद्रे यांनी कोल्हापुरी कट्टाच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने केले होता.

नवोदिता घाटगे म्हणाल्या, “महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांसह त्यांच्या  उद्योगांना चालना देण्यासाठी, स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. ‘कोल्हापुरी कट्टा’च्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण आणि स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

यावेळी संयोजिका स्मिता पाटील, पार्थ वणकुद्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.