राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कोणता निर्णय घेण्यात आला..?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कोणता निर्णय घेण्यात आला..?

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यापूर्वी विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्यात आली.

या बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मांडला. या प्रस्तावाला पक्षाचे जेष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे. इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सगळी सूत्र सुनेत्रा पवार यांच्या हातात असणार आहेत. 

सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी ५ ते ५ वाजून १२ मिनिटांपर्यंत असणार आहे. यावेळी मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. तर अतिरिक्त पदभार असलेले राज्यपाल आचार्य देवव्रत हे यावेळी शपथ देणार आहे. आज फक्त सुनेत्रा पवारांचाच शपथविधी सोहळा होणार आहे.

अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासोबतच अर्थ आणि इतर महत्वाचे खातेही होते. पण उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खाते वगळता इतर खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी कायम राहणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशनानंतर कदाचित अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा सुनेत्रा पवार यांना मिळू शकते.  

या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह सर्व आमदार, मंत्री आणि नेते उपस्थित राहिले होते.