१९४७ काश्मीर युद्ध ते 'ऑपरेशन सिंदूर' ; कसा आहे भारत -पाक संघर्षाचा इतिहास ? एका क्लिकवर जाणून घ्या.

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : ‘ऑपरेशन सिंदूर’ या नव्या लष्करी मोहिमेमुळे भारत-पाकिस्तानमधील दीर्घकालीन संघर्षाच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडला गेला आहे. पहलगामवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्याने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेसह भारत-पाक संघर्षाचा प्रदीर्घ इतिहास अधोरेखित होतो, ज्याची सुरुवात १९४७च्या पहिल्या युद्धापासून होते.
१९४७: पहिले भारत-पाक युद्ध
स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीरवर ताबा मिळवण्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये पहिले युद्ध झाले. पाकसमर्थक आदिवासी मिलिशियाने हल्ला केल्यानंतर महाराज हरिसिंग यांनी भारतात विलिनीकरण केले. भारतीय सैन्याच्या हस्तक्षेपानंतर युद्धाला सुरुवात झाली आणि १९४९ मध्ये युद्धविराम झाला.
१९६५: दुसरे भारत-पाक युद्ध
पाकिस्तानने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’द्वारे नियंत्रण रेषा ओलांडून हल्ला चढवला. भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. हा संघर्ष सप्टेंबर १९६५ पर्यंत सुरू राहिला.
१९७१: बांगलादेश मुक्तिसंग्राम
पूर्व पाकिस्तानात (आताचा बांगलादेश) झालेल्या दडपशाहीविरोधात भारताने युद्धात उडी घेतली. पाकिस्तानला शरण येऊन बांगलादेशचा जन्म झाला.
१९९९: कारगिल युद्ध
पाकिस्तानच्या सैन्य व दहशतवाद्यांनी कारगिलच्या शिखरांवर कब्जा केल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन विजय’ राबवले. २६ जुलै १९९९ रोजी भारताने पुन्हा ताबा मिळवला.
२०१६: उरी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राइक
उरीत १९ भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर भारताने नियंत्रण रेषेपलीकडे सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
२०१९: पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राइक
४० जवान शहीद झालेल्या पुलवामा हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राइक केली.
२०२५: ऑपरेशन सिंदूर
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत निर्णायक कारवाई केली. या मोहिमेसह भारत-पाक संघर्षाचा सातवा टप्पा म्हणून एक नवीन अध्याय नोंदवला गेला.