बालदिन का साजरा केला जातो?
Childrens Day News - भारतामध्ये १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. नेहरूंना लहान मुलांवर खूप प्रेम होते, त्यामुळे मुले त्यांना "चाचा नेहरू" म्हणत. त्यांच्या मुलांवरील प्रेम, शिक्षणाबद्दलची दृष्टी आणि बालकल्याणासाठीच्या कार्यामुळे त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. डोक्यावरची खास नेहरू टोपी आणि जॅकेटमधील लाल गुलाब हा देखणा पोषाख आजही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख जिवंत ठेवतो. १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या नेहरूंनी सुरुवातीचे शिक्षण घरीच घेतले. पुढे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञान या विषयात पदवी संपादन केली. १९१२ मध्ये भारतात परतल्यावर त्यांनी राजकारणात पदार्पण केले आणि त्यानंतरचे भारतीय राजकारण दीर्घकाळ त्यांच्या नेतृत्वाभोवती केंद्रित राहिले.
बालदिन साजरा करण्यामागचे मुख्य उद्देश -
- मुलांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करणे
- शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित बालपणाचे महत्त्व सांगणे
- मुलांमध्ये सर्जनशीलता, आनंद आणि आत्मविश्वास वाढवणे
- समाजाने मुलांच्या विकासासाठी अधिक जबाबदार बनावे हा संदेश देणे




