जयंत पाटलांचं चाललंय काय ? मुख्यमंत्री फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेंशी ‘नंदनवन’वर गुप्तभेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना मोठे उधाण आले आहे. जयंत पाटील यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी जात ही भेट घेतली. याआधी १४ जुलै रोजी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, ज्यावेळी अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे देखील उपस्थित होते. या सलगच्या भेटीगाठींमुळे राजकीय तर्क-वितर्कांना वेग आला आहे.

पडद्यामागे नक्की काय? सध्या राजकीय वर्तुळात शरद पवार गट महायुती सरकारसोबत जाण्याच्या तयारीत असल्याच्या आणि या गटाला सरकारमध्ये वित्त व नियोजन खाते दिले जाण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जयंत पाटील हे या खात्याचे मुख्य दावेदार मानले जातात; मात्र शिवसेनेचा (शिंदे गट) वित्त खाते राष्ट्रवादीला देण्यास विरोध असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत कोणताही सरकारी अधिकारी उपस्थित नसल्याने पडद्यामागे काही वेगळे राजकीय गणित शिजत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जयंत पाटलांचे स्पष्टीकरण दरम्यान, याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर झालेल्या उलट-सुलट चर्चांवर जयंत पाटील यांनी १५ जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले होते. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी इस्लामपूर (ईश्वरपूर) नगरपालिकेच्या नगराध्यक्षांवर घेतलेल्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच हे प्रकरण नगरविकास खात्याशी संबंधित असल्याने आपण याविषयी नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यानुसारच आज ही भेट झाल्याचे सांगितले जात असले, तरी सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांमुळे या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




