महापालिका निवडणूकीसाठी काँग्रेसकडून ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
कोल्हापूर (प्रतिनिधी) - महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिल्या टप्प्यात ८१ पैकी ४८ उमेदवारांची ‘जंबो’ यादी जाहीर केली आहे. आ. सतेज पाटील यांनी ही यादी प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये १५ माजी नगरसेवकांसह ३३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. माजी उपमहापौर अर्जुन माने, संजय मोहिते, प्रकाश पाटील तसेच माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांचाही या यादीत समावेश आहे. अनुभवी आणि नवोदित उमेदवारांचा समतोल साधण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून इच्छुक उमेदवारांचे लक्ष या यादीकडे लागले होते. यादी जाहीर होताच उमेदवारी मिळालेल्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले, तर नाव न आल्याने काहींमध्ये नाराजी व्यक्त झाली. महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी किंवा ‘इंडिया आघाडी’च्या माध्यमातून लढवण्याबाबत चर्चा सुरू असताना राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत असून, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यातील समन्वय वाढताना दिसत आहे.
महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी तब्बल ३२९ इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. सकाळपासून सुरू असलेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर रात्री अकरानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर, आनंद माने, राजू लाटकर, भारती पोवार, सरलाताई पाटील, तौफिक मुल्लाणी, विक्रम जरग आणि भरत रसाळे यांचा समावेश असलेल्या समितीने ही प्रक्रिया पार पाडली.
निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे -



निवडणूकीच्या रिंगणात असलेले माजी नगरसेवक पुढीलप्रमाणे -
माजी उपमहापौर प्रकाश पाटील (प्रभाग क्र. ३, ना.मा.प्र), माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर (प्रभाग क्र. ४, सर्वसाधारण), अर्जुन माने (प्रभाग क्र. ५, सर्वसाधारण), प्रतापसिंह जाधव (प्रभाग क्र. ६, सर्वसाधारण), उमा बनछोडे (प्रभाग क्र. ७, सर्वसाधारण), राजू दिंडोर्ले (पुरस्कृत), दीपा मगदूम (प्रभाग क्र. १०, सर्वसाधारण महिला), जयश्री चव्हाण (प्रभाग क्र. ११, नागरिकांचा मागास प्रवर्ग), ईश्वर परमार (प्रभाग क्र. १२, सर्वसाधारण), संजय मोहिते (प्रभाग क्र. १५, सर्वसाधारण), प्रवीण केसरकर (प्रभाग क्र. १७, सर्वसाधारण), भूपाल शेटे (प्रभाग क्र. १८, सर्वसाधारण), मधुकर रामाणे (प्रभाग क्र. १९).




