आ. सतेज पाटील यांना निकालादिवशीच समजेल भाजपची बी टीम - मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर (प्रतिनिधी) - काँग्रेसचे होऊ घातलेले विरोधी पक्षनेते आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आरोप केला होता की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि जनसुराज्य पक्ष हे भारतीय जनता पार्टीची "बी टीम" आहेत. परंतु; १६ जानेवारी रोजी महापालिकेच्या निकालादिवशीच आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना समजेल की, खरोखरीच बी टीम कोण आहेत असे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. आठ, नऊ, दहा व १३ मध्ये जाहीर सभांमध्ये केले. त्यांच्या समवेत खासदार धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, आ. राजेश क्षीरसागर, भाजपाचे शहराध्यक्ष विजय जाधव या प्रमुखांसह प्रभागनिहाय उमेदवार व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विरोधकांवर टीका करताना मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, केंद्रासह राज्यांमध्ये कुठेही यांची सत्ता नाही. त्यामुळे विकास कामांसाठी निधी कुठून आणणार आणि कोल्हापूर शहराचा विकास कसा करणार, हा खरा संशोधनाचाच विषय आहे. अशी वस्तुस्थिती असताना काँग्रेस पक्षवाले मात्र नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. कोल्हापूरच्या सुज्ञ नागरिकांनी या दिशाभूलीला बळी न पडता महायुतीच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, वास्तविक महानगरपालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था ह्या रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारखे नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी असतात. कोल्हापूर महापालिकेची सत्ता महायुतीकडे दिल्यास शहरात विकासाची गंगा येईल. महायुतीचे सर्वच नगरसेवक गोरगरिबांच्या, सामान्य नागरिकांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी कल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचवतील.
कोल्हापूरचा स्वर्ग करू......
मंत्री मुश्रीफ म्हणाले, एका दैनिकाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने कागल शहरांमध्ये झालेल्या अभूतपूर्व विकासाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यावरून आपल्याला लक्षात आले की, संधी मिळाली आणि सत्ता, निधी उपलब्ध असेल तर शहराचा कसा स्वर्ग होऊ शकतो. महायुतीला साथ द्या, कोल्हापूरचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही.




