नगराध्यक्षांसह सर्व उमेदवारांच्या विजयाने आमच्या युतीच्या बाजूने जनतेचा कौल - राजे समरजितसिंह घाटगे
कागल (प्रतिनिधी) - राज्यातील २८८ नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साडे सात हजारहून अधिक तर नगरसेवक पदाचे उमेदवार नऊशे ते बाराशे इतक्या मोठ्या फरकाने जनतेने निवडून दिले आहेत. कागलच्या जनतेने नगराध्यक्षांसह नगरसेवक पदाच्या सर्व जागांवर आमचे उमेदवार निवडून देऊन आमच्या युतीच्या बाजूने कौल दिला असल्याचे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे लीड तर राज्यात उच्चांकी असावे असे आमचे मत आहे. आमच्या युतीवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कागलच्या जनतेचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. जाहीरनाम्याप्रमाणे विकासकामे पूर्ण करण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ व आमच्या माध्यमातून केवळ कागल व मुरगुड शहर नव्हे तर संपूर्ण कागल तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणार आहोत. मुरगुडच्या जनतेचाही कौल आम्ही मान्य करतो. यापुर्वी सांगितल्याप्रमाणे आम्ही एकत्रित मिळून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आमच्या सोबत माजी आमदार संजयबाबा घाटगे सुद्धा असतील असेही ते म्हणाले.




