MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ऑनलाइन (CBT) परीक्षा तातडीने नाही
मुंबई (प्रतिनिधी) : एमपीएससीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संगणक आधारित (CBT) परीक्षा पद्धतीची तातडीने अंमलबजावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले असून, CBT परीक्षा पद्धत ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थी संघटनांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत भरती प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेत होणे गरजेचे असल्याचे सांगतानाच, नवीन परीक्षा पद्धती लागू करण्यापूर्वी विद्यार्थी आणि प्रशासनाला पुरेसा वेळ मिळणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यामुळे तोपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा सध्याच्या ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात येतील. मात्र, CBT प्रणालीसाठी आवश्यक यंत्रणा उभारून ती टप्प्याटप्प्याने लागू करण्यावर भर दिला जाणार आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतला जाणार आहे.
यापूर्वी एमपीएससीच्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीला विरोध करत विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा सुरू ठेवण्याची मागणी केली होती. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर विद्यार्थी शिष्टमंडळाने आमदार अभिमन्यू पवार यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन देण्यात आले होते आणि आता त्यानुसार विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. ते म्हणाले, "बहुसंख्य विद्यार्थ्यांची इच्छा ऑफलाइन परीक्षा सुरू ठेवण्याची होती. सरकारने विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेत हा निर्णय घेतला आहे. भविष्यात आवश्यक तयारी करून ऑनलाइन परीक्षा टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येतील. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे."




