गॅस, इंधन पुरवठ्याबाबत कुणीही अफवा पसरवू नका; एकनाथ शिंदें

गॅस, इंधन पुरवठ्याबाबत कुणीही अफवा पसरवू नका; एकनाथ शिंदें

मुंबई (प्रतिनिधी) : अमेरिका, इस्त्राईल व इराण यांच्यामधील युद्धाचे थेट परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर त्याचा थेट परिणाम जाणवू लागला असून गॅस वितरण प्रणालीला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर तात्पुरते स्वरूपात बंद केल्याने घरगुती गॅसधारकही धास्तावले आहे. त्यातच, घरगुती गॅस सिलेंडरही आता 45 दिवसांनी मिळणार असा आदेश निघाल्याने गॅस ग्राहकांनी पॅनिक होऊन गॅस एजन्सी समोर गर्दी करायला सुरुवात केली. मात्र, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बारकाईने लक्ष ठेऊन आहेत, कुणीही अफवा पसरवू नये, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.  

गॅस, इंधन पुरवठ्याबाबत केंद्र सरकार अतिशय बारकाईने आणि गांभीर्याने लक्ष देत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे, गॅसचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गॅस पुरवठा आणि तुटवड्यासंदर्भात भूमिका मांडली. काही लोक अफवा पसरवत आहेत, पण कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहे, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.

गॅस सिलेंडरचा कुठेही तुटवडा नसून ग्रामीण भागातील दुर्लभ विक्रेत्यांकडे 45 दिवसांनी तर शहरी भागातील ग्राहकांकडे 25 दिवसांनी नियमित पुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, विविध जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयाकडून काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली असून या पथकाद्वारे गॅस एजन्सी व गोडाऊन मध्ये जाऊन ग्राहकांची कनेक्शन संख्या, सिलेंडर संख्या आदींची तपासणी केली जात आहे. गॅस सिलेंडर वितरण प्रणाली कशी आहे, याबाबत या पथकाकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण सध्या बंद असून घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. ग्राहकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसील कार्यालयातील विशेष पथक व गॅस एजन्सी मालक यांच्याकडून केले जात आहे.